घरामधे तू ससा

Posted on Saturday 8 May, 2010 by अभय

सिंह जरी तू जगतासाठी
घरामधे तू ससा
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!
तुझ्या आरोळ्या डरकाळ्यांनी
दुमदुमते तारांगण
तुझी कर्तबे पाहुन होते
अचंबित तारांगण
घरात येता कशास होतो
तुझा कोरडा घसा!!
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!
जशी एकदा चढते तुझिया
अंगावरती लुंगी
उतरुन जाती शस्त्रे सारी
सिंह बनतसे मुंगी...
कशास ऐसा आक्रमणाचा
सोडुन देशी वसा...
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!
चालवायचा तूच विराटा
घरातली या गादी
हाय कशी ही वेळ तुझ्यावर
आज पुसतसे लादी!!
सम्राटाच्या नशीबातही
भोग गुलामाजसा
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!
कधी तुला हे कळेल राजा
कशामुळे हे घडते
तुझ्या जिवाच्या राणीवाचुन
काय तुझे रे अडते
कशास राजा राणीसाठी
होशी वेडापिसा
हीच कहाणी तुझी मानवा
हाय असा तू कसा!

 

0 Responses to "घरामधे तू ससा":